पणजी, दि. १९:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री तथा निवडणूक सह प्रभारी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती दर्शन जर्दोश आणि गोव्याचे प्रभारी सी टी रवी उद्या सोमवार दि. २० रोजी दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर येत आहेत.
तीन – चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते राज्यातील एकूण स्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन दिवसांच्या भेटीत मुख्यमंत्री, मंत्री, पक्षाचे आमदार, पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी ते चर्चा करतील. आणि निवडणूक तयारीचा आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन करतील. याचबरोबर पक्षाच्या विविध समित्या, महिला, युवक, अल्पसंख्याक, ओबीसी आदी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तसेच बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व केले. उत्तम वक्ता, अभ्यासू, व्यासंगी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आहे. यापूर्वी त्यांनी बिहरसह अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
गोवा आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक साम्य याचा विचार करता श्री फडणवीस यांच्या निवडीचा गोवा भाजपाला निश्चित लाभ होईल.
केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी हे आंध्रप्रदेश मधून लोकसभेवर निवडून आले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. कला व संस्कृती, पर्यटन नॉर्थ – ईस्ट विभाग विकास राज्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री दर्शना jardosh या सुरत मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे रेल्वे आणि टेक्सटाईल मंत्रालयाचा कारभार आहे. २००९ च्या सार्वजनिक निवडणुकीत त्या पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या.
