पणजी :पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे दिग्गज नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह रविवार दि. १६ रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. फार्मागुडी येथील इंजिनिरिंग कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकीयांना संबोधित करणार आहेत.
देशातील सार्वजनिक निवडणुका केवळ एक वर्षांवर आल्या आहेत. भाजपने या निवडणुकांचे रणशिंग यापूर्वीच फुंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी राष्ट्रीय नेत्यांनी देशातील राज्याचे दौरे सुरू केले आहेत. भाजपाचे संघटन निवडणुकीच्या कामाला लागले असून सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. ३५० जागांचे लक्ष्य असलेल्या भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. यामुळे गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या दैऱ्याकडे राजकीय विश्लेषकांसह नागरीकांचे लक्ष लागले असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला गोमंतकीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी केले आहे.